अमृतसर : वृत्तसंस्था । कृषि विधेयकाविरोधात शिरोमणी अकाली दल येत्या २५ सप्टेंबरला संपूर्ण पंजाबमध्ये ‘चक्काजाम’ आंदोलन करणार आहे. त्याशिवाय एक ऑक्टोंबरला शिखांच्या तीन धार्मिक तख्तांवरुन मोहाली पर्यंत ‘किसान मार्च’ काढण्यात येणार आहे. शिरोमणी अकाली दल केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एक घटक पक्ष आहे.
मागच्या आठवडयात कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, शिरोमणी अकाली दल अजूनही भाजपासोबत आहे. सोमवारी सुखबीरसिंग बादल यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक पार पडली.
२६ ते २९ सप्टेंबर दरम्यान शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल राज्याच्या वेगवेगळया भागात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. “२५ सप्टेंबरला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना चक्का जाम करण्याचे निर्देश दिले आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल” पक्षाचे प्रवक्ते दलजीत सिंग चीमा यांनी ही माहिती दिली.