मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक पियुष मोरे यांची निवड होण्यासाठी काही तास उरले असतानाच उच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यातला पहिला नगराध्यक्ष बनता बनता राहिला आहे.
मुक्ताईनगरच्या तत्कालीन नगराध्यक्ष नजमा तडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांच्या जागेवर कोणी महिला उमेदवार नसल्यामुळे एसटी या प्रवर्गातून निवडून आलेले पियुष मोरे महाजन यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. नगराध्यक्ष पद निवडीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे आज फक्त त्यांच्या निवडीची औपचारिकता उरलेली होती. मात्र नगराध्यक्षपद निवडीसाठी अवघे काही तास उरले असताना उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याबाबत अजून न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसले तरी आदेश प्राप्त होईपर्यंत प्रक्रियेला स्थगिती देण्याचे निर्देश हे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकार्यांना दिले आहे यामुळे आज दुपारी बारा वाजता होणारी नगराध्यक्ष निवड प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
पियुष मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष बनणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्यायालयाने प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे आता त्यांचे स्वप्न भंग झाले आहे. दरम्यान या प्रकरणी आता स्वतः मोरे हे न्यायालयात दाद मागू शकता.त ते नेमके पुढे काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.