कोरोना देवीचा प्रकोप असल्याचा अंधश्रद्धेतून प्रचार

 

भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशमधील बुंदेलखंडसह काही जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांमध्ये कोरोना हा देवीचा प्रकोप असल्याचा प्रचार केला जात  आहे. निवाडी जिल्ह्यामध्ये अशाच समजुतीला बळी पडून शेकडो गावकऱ्यांनी कलश यात्रा काढल्याची माहिती समोर आलीय.

 

शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलं टोळ्याटोळ्यांनी हातामध्ये पाण्याचे कलश घेऊन येथील अछरुमाता मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी आणि प्रकोपापासून वाचवण्याची मागणी देवीकडे करण्यासाठी पोहचले.  व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि वैज्ञानिक प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे   अशा  अंधविश्वासाच्या घटना समोर येत आहेत.  या कलश यात्रेदरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसून आलं. निर्बंधांमुळे मंदिर बंद असल्याने गावकऱ्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अभिषेक केला.

 

 

कोरोनापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी देवीकडे प्रार्थना केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत आहेत. निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूर आणि आजूबाजूच्या गावातील अनेक गावकरी टोळ्याटोळ्यांनी अछरुमाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. यामध्ये महिला, पुरुष आणि त्याचबरोबर लहान मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या लोकांना पृथ्वीपूरजवळच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्यांचं काहीही न ऐकता मंदिराकडे जाणार असल्याचं सांगितल्याने पोलिसही हतबल दिसून आले.मंदिराबाहेर गावकऱ्यांनी गर्दी करु नये म्हणून पोलीस प्रयत्न करत होते, सूचना देत होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

 

Protected Content