जळगाव, प्रतिनिधी । पिंप्राळा रोडवरील शाहूनगर तपस्वी हनुमान मंदिराजवळ एका तरूणाला पोलिसाने अचानक येवून बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने शाहुनगरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्दीत आलेल्या पोलिसाने ‘सिंघम’ स्टाईल वापरत त्या तरूणाला मारझोड सुरूच ठेवून रस्त्यावरून फरफटत नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याने तक्रार केल्याने पोलिसाने ‘त्या’ तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली. याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाहुनगरातील तपस्वी हनुमान मंदिराचे पुजारी बालक सरजुदास (वय-२८) यांना गोलू वाडकर आणि दिलीप आसारे (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) २२ मे रोजी रात्रीच्या नऊच्या सुमारास दोघांनी शिवीगाळ करून ‘या मंदिरातून निघून जा, नाहीतर, तुम्हाला मारून-मारून हकलून लावू’…! अशी धमकी दिल्याप्रकरणी (भादवी 504,506) प्रमाणे अदखलपात्र नोंद करण्यात आली आहे. दाखल तक्रारीत शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सकाळी दखल घेतली नाही, म्हणून चक्क मुख्यालयात कार्यरत पोलिसाने गोलू वाडकर या तरुणाला आज हनुमान मंदिराजवळून सिंघम स्टाईल मारहाण करत रस्त्यावरून त्याला फिरविले. हा पोलिस गणवेशात होता. त्यामुळे त्याला अडसर आला नाही. मात्र, अमानुष मारहाण बघता शाहूनगर मशिदीचे याकूब बांगी आणि सलीम भाई अशा दोघांनी पोलिसाच्या तावडीतून या तरुणाला वाचवून शहर पोलिसांना फोन करून बोलावले. सुधीर साळवे सह एक कर्मचारी येऊन मारहाण झालेल्या तरुणाला बसवून शहर पोलीस ठाण्यात नेले.
शहर पोलीस ठाण्यात दांगडो
घडल्या प्रकारासाठी माजी नगरसवेक विजय वाडकर, संतोष शेळके, मनोज राणे, सरदार तडवी, याकूब बांगी, सलीम शेख असे निरीक्षकांना भेटण्यासाठी आले असताना त्या पोलिसाने शेळके नामक व्यक्तीच्या अंगावर चाल करत कानशीलात लगावली. पोलीस ठाण्याच्या वाद विकोपाला जावून जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने येणारे जाणारे व्यक्ती पोलीस स्टेशनकडे पाहत गर्दी करत होते. पोलीस कर्मचारी ‘नटवर’ याने संतोष एकनाथ शेळके (वय-४७) याला मारहाण केल्याप्रकरणी पुजारीसह पोलीस कर्मचाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.