‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी निवडीची कार्यवाही मिशन मोडवर करावी – निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांची निवड मिशन मोडवर करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.

 

‘शासन आपल्या दारी’या अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनातर्फे सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 जून, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौरा नियोजित आहे. शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

शासन आपल्या दारी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तातडीने करुन त्याची यादी जिल्हा प्रशासनास द्यावी. लाभार्थी निवड करतांना पात्रतेचे निकष तपासून त्यांचेकडून अर्ज भरुन घेणे, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्याची कार्यवाही येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाचे लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन करावे. लाभार्थी निवड करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांना व त्यांचे कुटूंबिय यांना आणण्याचे नियोजन करण्याच्याही सूचना दिल्यात. शासन आपल्या दारी या उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपर्यंत सुरु राहणार असल्याने प्रत्येक विभागाने त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी सर्व विभागप्रमुखांना सुचित केले.

Protected Content