जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गरोदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर देखील महिलेचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. अशा गुंतागुंत परिस्थितीमध्ये स्त्री रोग विभागाच्या डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेऊन गरोदर महिलेची गर्भपिशवी काढून तिला जीवदान दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गरोदर महिलेला प्रसूतीदरम्यान धोक्यात आलेला जीव वाचवण्यात स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश आले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत या महिला रुग्णाला नुकताच रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जळगाव मधील २७ वर्षीय विवाहिता प्रसुतीसाठी स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागात दाखल झाली होती. विवाहितेला यापूर्वी प्रसूतीच्या कारणास्तव दोन वेळा सिजर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. यंदा त्यांच्यावर तिसरी सिजर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. प्रसूती झाल्यानंतर बाळ बाहेर आल्यावरदेखील संबंधित गरोदर महिलेचा रक्तस्त्राव थांबत नव्हता.
सिजर दरम्यान असे आढळून आले की, तिची गर्भपिशवी आतडे हे एकमेकांना चिकटलेले होते. व सिजर दरम्यान तिला अतिरक्तस्राव होत होता. त्यामुळे तिची गर्भपिशवी काढावी लागली. त्यादरम्यान तिला ४ रक्ताच्या बॅगा चढवण्यात आल्या व ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल ४ तास लागले.
महिलेचा जीव वाचल्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले. या महिला रुग्णाला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड ,स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. सदर महिलेवर उपचार करण्याकामी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रच्या सहा. प्राध्यापक डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ.प्रदीप लोखंडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ प्रणिता खरात यांच्यासह शस्त्रक्रिया गृह इन्चार्ज नीला जोशी, कक्ष क्रमांक १२ च्या इन्चार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल आदींनी परिश्रम घेतले.