जळगाव, प्रतिनिधी । दैनंदिन आयुष्यात काम करीत असतांना आपल्या तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्वत: शिस्त लावली तर आजाराला आपण दूर ठेवू शकू, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मौखिक आरोग्य स्वच्छता सप्ताह १ ते ७ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, ४ ऑगस्ट रोजी रुग्णालयात सप्ताहाचे उदघाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.उत्तम तासखेडकर, दंतशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, डॉ.उदय पाटील, डॉ.अनुराधा वानखडे, डॉ. संपदा गोस्वामी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्ज्वल करुन उदघाटन केले. त्यानंतर डॉ.नितीन भारती यांनी प्रस्तावनेमध्ये सप्ताह साजरा करण्याबाबत माहिती दिली. डॉ.इम्रान पठाण यांनी दातांची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत प्रात्याक्षिकाव्दारे उपस्थितांना माहिती दिली. सकाळी व रात्री असे दोनदा दातं योग्य पध्दतीने घासावे. गुटखा, तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहावे, असाही सल्ला दिला. यावेळी डॉ.संपदा गोस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एन.एस.चव्हाण् म्हणाले की, आपल्या मुखातून नकळतपणे अनेक जंतू पोटात शिरतात. त्यामुळे प्रत्येकाने तोंडाची नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. दातांची नियमित तपासणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी ओपीडी काळात उपस्थिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ.क्षितीज पवार, राहुल ब-हाटे, सूर्यकांत विसावे, शेख जुनेद समील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.नितीन भारती यांनी मानले.