शाळेत कंत्राटी पद्धतीने शिपाई भरतीचा अध्यादेश रद्द न केल्यास शासकीय कामकाज बंद करू भाऊसाहेब पठाण

 

पाचोरा, प्रतिनिधी । राज्यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं शिपायाचं पद राज्य शासनाने अध्यादेशाद्वारे संपुष्टात आणले असून त्या जागी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांमध्ये संतापाचे वातावरण असून हा अध्यादेश रद्द न झाल्यास आंदोलन करून शासकीय कामकाज बंद करू असा इशारा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदन दिला आहे.

शालेय शिक्षण स्तरावरील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या सुधारित आकृतीबंधाचा आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिपाई, रात्रीचा पहारेकरी, नाईक, सफाईगार, कामाठी, हमाल, परिचर, प्रयोगशाळा इत्यादी विभागातील कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर त्याजागी आता हे कंत्राटी शिपाई पदे व्यापणार आहेत. परिणामी शासकीय अनुदानित शाळांमधील राज्य शासनाचा चतुर्थश्रेणी कर्मचारी ही संकल्पनाच संपुष्टात येणार आहे. सुमारे एक लाख कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.
मूळात चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे वेतन अल्प असून त्यांची कौटुंबिक स्थितीदेखील हलाखीची असते म्हणूनच त्यांच्या जागी अनुकंपा किवा वारसा हक्काने त्यांची मुले शासनसेवेत त्याच पदावर येत असतात. पण आता हेच पद संपुष्टात आणल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचाही भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनके जिल्ह्यांमध्ये अनुकंपा उमेदवारांच्या प्रतिक्षा याद्या असून ते नोकरीच्या आशेवर आहेत. त्याचे वयोमानदेखील वाढत आहे. ही गंभीर बाब असूनही थेट त्यांच्यावर शासनाने नव्या अध्यादेशाने आघात केला आहे.
शिपाई हे प्रत्येक शाळेचा कणा आहेत. त्यांची सरळसेवा पद्धतीने या नियुक्त्या व्हाव्यात, असे महासंघाचे म्हणणे आहे. शासनाने सध्या शाळांचेही खासगीकरण करण्याचे ठरवले असून त्या दिशेने वाटचाल करत अशाप्रकारे पावलं टाकायला सुरूवात केली आहे, हे कदापीही सहन केले जाणार नाही, त्यामुळे तत्काळ हा अद्यादेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, महाराष्ट्राच्या सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यात सहभागी होऊन शासकीय कामकाज बंद पाडतील असा इशाराही भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

Protected Content