एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील रिंगणगाव येथील रेशमाबाई नारायण पाटील माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा धान्य चोरून नेणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकासस इतर दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावी अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रिंगणगाव येथील रेशमाबाई नारायण पाटील माध्यमिक शाळेत शासनाच्या आदेशानुसार शालेय पोषण आहाराचे वाटप घरपोच देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शासनाने शालेय पोषण आहार हा संबंधित शाळेपर्यंत पोहचविण्यात आला असून आता हा आहार विद्यार्थी व पालक यांना बोलावून सोशल डिस्टनिंगचा अवलंब करून वाटप करण्याच्या सुचना असतांना याचा गैर फायदा करत शाळेचे मुख्याध्यापक शरद नारायण सोनवणे, शिक्षक प्रशांत देवराम अहिरे, लिपीक मेघराज अंबादास महाजन आणि शिपाई पद्माकर जगदिश चव्हाण यांनी संगनमत करून गुरूवार ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापकाची कार क्रमांक (एमएच ०४ डीजे १२६५) गहू व तांदुळाची गोणी घेवून जात होते.
शाळेच्या आवारात भरदुपारी कार उभी असल्याचा संशय ग्रामस्थांना बळावल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता शासनाने दिलेला शालेय पोषण आहाराचा तांदूळ घेवून जात असल्याचे लक्षात आले. ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील वासुदेव श्रावण मोरे आणि शाळेचे संचालक अध्यक्ष आधार नारायण पाटील यांना बोलाविले. यात चौकशी केली असता मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिपायाच्या मदतीने तांदुळाची एक गोणी स्विप्ट डिझायर कारमध्ये चोरून नेत असल्याचे समाजले. याप्रकरणी गावातील चार तरूणांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रार केली असून पुढील कारवाई करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित विभागाला दिले आहे.