मंदसौर वृत्तसंस्था । महान देशभक्त, शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाटकाची रिहर्सल करताना खरोखरच फाशी लागल्याने नाटकातील एका कलाकार विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियांशू मालवीय (वय-१२) असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रियांशूच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमात शहीद-ए-आजम भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जीवनाटक बसवण्यात आले होते. ही घटना मध्य प्रदेशातील मंदसौर येथे घडली.
प्रियांशू या नाटकात इंग्रज शिपायाची भूमिका साकारत होता. शाळेतील कार्यक्रम आटोपून प्रियांशु घरी आला दुसऱ्या दिवशी तो आपल्या शेतामध्ये नाटकाची रिहर्सल करत होता. यावेळी तो भगतसिंग बनला होता. त्याला भगतसिंग यांना फाशी देण्याचा प्रसंग खेळायचा होता. त्याने शेतातील बांबूच्या सालीचा फाशीसाठी फास तयार केला.
मात्र ही फाशी घेत असताना हा फास त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळला गेला आणि यात त्याचा श्वास कोंडला. यामुळे प्रियांशूचा मृत्यू झाला. घरातील लोकांनी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तो काहीच हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांना घटनास्थळावर एक मोबाइल सापडला. या मोबाइलमध्ये शाळेतील नाटकाचा व्हिडिओ असल्याचे पोलिसांनी पाहिले. या व्हिडिओद्वारेच पोलिसांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रियांशूचा मृत्यू रिहर्सल करताना झाला असा अंदाज लावला.