शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा उद्यापासून श्रीगणेशा!

 

जळगाव,प्रतिनिधी । शहरात गणरायाची ठिकठिकाणी स्थापना झाली असून रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहे. खड्डे बुजविण्यासाठी मनपा प्रशासनाने राबविलेली प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या दि.२५ पासून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे खडी आणि मुरूम वापरून बुजविण्याचे काम सर्वात अगोदर केले जाणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली आहे.

भूमिगत गटारी आणि अमृत योजनेच्या कामामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गेल्या आठवड्यात महापौरांनी याबाबत बैठक घेऊन संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या. मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

२४ ऐवजी ४८ लाखांचे होणार काम!
शहरात गल्लोगल्ली खड्डे झाले असून ते बुजविण्यासाठी २४ लाखांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. खड्ड्यांची संख्या लक्षात घेता काही मनपा सदस्यांकडून त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तो मुद्दा मांडण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी २४ लाखातून कामे होणार आहे.

५ कोटीतून होणार रस्त्यांचे काम
शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे डांबरी रस्ते तयार करण्याचे काम रखडले होते. निवडक प्रभाग निहाय अंदाजपत्रक तयार करणेकामी बांधकाम विभागास सूचना केलेल्या आहे. त्यानुसार अंदाजे ४ ते ५ कोटींच्या निविदा पावसाळा संपेपूर्वी १५ सप्टेंबरच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात रस्ते तयार करण्यासाठी अंदाजे २४ लाखांचा निधी मिळणार असून त्यातून डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

प्रशासन, नगरसेवकांनी लक्ष देऊन काम करून घ्यावे!
शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. संबंधित मक्तेदारकडून मनपा प्रशासन आणि त्या-त्या प्रभागाच्या नगरसेवकांनी स्वतः लक्ष घालून काम करून घ्यावे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून सध्या हा डागडुजीचा मार्ग अवलंबला जात आहे. सर्व खड्डे योग्य पध्दतीने बुजविले जात आहे की नाही हे मनपा अधिकारी व नगरसेवक यांनी तपासावे, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content