शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल ; उद्या शस्त्रक्रिया

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या  एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार होती. पण त्यांना आजच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  नवाब मलिक यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पोटात पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना आजच रुग्णालयात दाखल करावं लागलं असल्याचं या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. सोमवारीच त्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सर्जरी करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं.

 

 

 

 

सोमवारी देखील शरद पवारांना पोटात दुखू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. बुधवारी त्यांची सर्जरी नियोजित करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारीच शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं.

 

“हा बॉल स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी एंडोस्कोपी उद्या केली जाईल. त्यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर मायदेव त्यांच्यावर एंडोस्कोपी करतील. पोटात दुखतंय म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. उद्या दुपारी ३ च्या सुमारास एंडोस्कोपी केली जाणार आहे”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू असून या पार्श्वभूमीवर शरद पवार केरळ आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पोटाच्या त्रासामुळे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवारांनी नुकत्याच दिल्लीमध्ये दोन पत्रकार परिषदा देखील घेतल्या होत्या.

Protected Content