मुंबई प्रतिनिधी । ”शरद पवारांना आताच जाग आली का ?” या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देतांना ते नेहमीच जागे असतात असे कौतुक करत आज शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोकण दौर्यावरून भाजपने टीका केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आजच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. आता श्री. शरद पवार हे त्यांच्या पद्धतीने लोकांना भेटून नुकसानीची, मदत कार्याची माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दुखणार्या पोटावर डावा हात दाबत उजवी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारली आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपर्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. असा टोला यात मारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही. सरकारला काय हे माहीत नाही? कृषी क्षेत्र हाच ज्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे त्या शरद पवारांना तरी असे सल्ले कोणी देऊ नयेत. वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत, पण पाटील व त्यांचे लोक पवारांना आता जाग आली काय? असे विचारून एकप्रकारे वाजपेयी-मोदींचाच अपमान करीत आहेत. प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. निसर्ग वादळात बामच्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा असा सल्ला यात शेवटी देण्यात आलेला आहे.