शरद पवारांमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करणाची संपूर्ण क्षमता – संजय राऊत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । “राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची देशाची जाण लोकांची नाडी, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहे. अनुभव दांडगा आहे.” असं विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे, याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? असं माध्यमांकडून संजय राऊत यांना विचारलं गेलं होतं. त्यावर ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “असा काही निर्णय झाल्यावरच मी यावर मत व्यक्त करेल. शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ते एक शिष्टमंडळ घेऊन गेले होते. त्यामध्ये राहुल गांधी, सीताराम येचुरी, बी राजा हे प्रमुख नेते होते. मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं असं ते शिष्टमंडळ होतं. त्याचं नेतृत्व बहुदा शरद पवार यांनी केलं असावं.”

“यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कस काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही यूपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.” असं देखील यावेळी राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात महाविकास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली. दरम्यान, शरद पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Protected Content