शरद पवारांनी अर्धसत्यच सांगितले — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे, परमबीर सिंग यांच्या समितीने वाझेचं निलंबन रद्द करून, त्यांना पदावर घेतलं. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या  निर्देशाने हे परमबीर सिंग यांनी केलं म्हणूनच एपीआय  महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे सर्वांनी पाहिलं आहे.” असं देवेंद्र  फडणवीस म्हणाले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारचे मार्गदर्शक  शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत भूमिका स्पष्ट केली. नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला. 

फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची पत्रकार परिषद मी पाहिली, ते म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती.”

 “आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. त्यांनी ज्यावेळी हे सांगितलं की वाझे यांना परमबीर सिंग यांनी घेतलं, हे खरंच आहे. परमबीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोकं होते, त्यांनी निर्णय घेतला वाझेंना परत घेतलं. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय सरकार झोपलं होतं का? सरकारला माहिती नव्हतं? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का? एखादा निलंबीत असलेला व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतला, तर त्याला महत्वाचं अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही?   सगळ्या महत्वाच्या केसेस,  त्यांच्याचकडे देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं का? , असेही ते म्हणाले 

“एपीआय वाझे यांच्या अटकेनंतर जे खुलासे होत आहेत आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केला आहे. हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. पण अशाप्रकारचा खुलासा करणारे, परमबीर सिंग हे पहिले व्यक्ती नाही. या पूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे.” अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.

“पोलिसांच्या बदल्यांमधलं रॅकेट पैशांची देवाणघेवाण त्यातली दलाली, या संदर्भातील संपूर्ण ट्रान्सक्रीप्टसह एक रिपोर्ट हा तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. तेव्हाच्या कमिशनर इंटलिजन्सच्या माध्यमातून तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही.” असं फडणवीस म्हणाले.

Protected Content