ब्लॅक टॉप परिसर भारतीय जवानांच्या ताब्यात

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पूर्व लडाख स्थित पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या प्रमुख टेकड्यांवर भारतीय सेनेनं वर्चस्व मिळवल्यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांनी चीनला आणखी धक्का दिलाय. ३० जवानांनी रणनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा ब्लॅक टॉप परिसराजवळ नव्या जागेवर आघाडी मिळवलीय.

पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर तैनात चिनी सैनिकांच्या हालचालींवर या ठिकाणावरून आयटीबीपी जवान सहज लक्ष ठेवू शकतात. आयटीबीपी जवान ‘फुरचुक ला’हून पुढे सरकत ब्लॅक टॉपपर्यंत पोहचले. फुरचुकला ४९९४ मीटर उंचावर आहे. आत्तापर्यंत आयटीबीपीचे जवान केवळ पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित फिंगर २ आणि फिंगर ३ भागाजवळच्या ‘धान सिंह पोस्ट’पर्यंतच तैनात केले जात असत.

‘आयटीबीपीचे डीजीपी एस एस देसवाल यांनी गेल्या आठवड्यात जवानांसोबत इथंच सीमेवर ठाण मांडलं होतं. त्यांच्यासोबत आयजी (पर्सोनल) दलजीत चौधरी आणि आयजी (लेह) दीपम हेदेखील उपस्थित होते. त्यांनी जवानांना आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

सध्या हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, येलो बंप वर आर्मी, आयटीबीपी आणि स्पेशल फ्रंटियर फोर्सनं वर्चस्व मिळवलंय. या जागेवरून थेट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दक्षिणेकडील पोस्ट क्रमांक ४२८०, डिगिंग एरिया आणि चुती चामला या ठिकाणच्या हालचाली स्पष्टपणे दिसू शकतात आयटीबीपीनं वास्तविक नियंत्रण रेषेजवळ आत्तापर्यंत ३९ हून अधिक जागांवर वर्चस्व मिळवलंय.

आयटीबीपीचे जवान चुशूल आणि तारा बॉर्डर आऊटपोस्टजवळ तैनात आहेत. चंदीगडहून अतिरिक्त कंपन्या एअरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती आयटीबीपी अधिकाऱ्यांनी दिली.

Protected Content