मुंबई : वृत्तसंस्था ।राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन सिल्व्हर ओकमधून बोलतोय, असा थेट फोन मंत्रालयात करण्यात आला. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकणमधल्या एका व्यक्तीलाही त्याचप्रकारे फोन करुन जमीन प्रकरण मिटवा असं सांगण्यात आलं. अशाप्रकारचे फोन करुन शरद पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यलयात एका पट्ट्याने फोन केला होता. फोन करून अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असं थेट फर्मानच दिलं होतं. खुद्द शरद पवार साहेब फोन करत आहेत,असा प्रकार कधी होत नाही. पुढे केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार पुढे आला. हा कॉल बोगस असल्याचं उघडकीस आल्यावर, मग मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक व्यक्तीला ताब्यात ही घेण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या आवाजाचा वापर करून फोन करण्यात आला. प्रतापराव वामन खंडेभारड यांच्याकडे संबंधित व्यवहारामध्ये अडकलेले पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकणमध्ये घडलाय. प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार गुरव याने शरद पवार यांचा आवाज काढून खांडेभराड यांना पैशाची मागणी केली होती. त्यांना किरण काकडे याची ही साथ मिळाली होती.
प्रताप खांडेभारड यांनी 2014 ला धीरज पठारे यांच्याकडून 1 कोटी 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना 13 एकर जमीन ही दिली होतो. मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती. त्यातच जमिनीचा व्यवहार होत नाही असे कारण सांगून पठारेने पुन्हा जानेवारी पासून पैशांची मागणी केली.
पैसे देत नाही म्हणून पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेटचा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापरला आणि खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केली. इंटरनेटचा वापर झाल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केलीय. त्यांना 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई नंतर खांडेभराड हे चाकणमध्ये राहत असल्याने आरोपी विरोधात चाकणमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आरोपींची चौकशी करणार आहेत.
शरद पवारांच्या आवाजाची नक्कल केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. शरद पवार यांचा आवाज काढून काम करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असंही सामंत म्हणाले.
“मला वाटतं पवार साहेब अशाप्रकारचे कधीच फोन करतात. परंतु आज त्यांच्या आवाजामध्ये अशाप्रकारे फोन करून दुरुपयोग होतोय हे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारचा फोन सिल्वर ओकचा असेल की इतर ठिकाणी कोणी केला, त्याची चौकशी होईल. तथापि अशा प्रकारचं पवार साहेबांच्या आवाजात फोन करणं हे राज्याच्या हिताचे नाही. ते राज्यातले महत्त्वाचे नेते आहेत, अशाप्रकारे त्यांच्या आवाजाचा दुरुपयोग झाला तर मला वाटतं पूर्णपणे सरकारमधली यंत्रणा विस्कळीत होईल, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.