जळगाव, प्रतिनिधी । शनिवार-रविवार दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. त्यात अनलॉक प्रक्रियेमध्ये सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र मार्केट अजूनही थंडावलेले असल्याने जळगावचे व्यापारी आर्थिक तणावात आहे. ही बाब लक्षात घेऊन मार्केटसाठी पाच दिवसांचा आठवडा असल्याने सुमारे आठ दिवस दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. परंतु, भाडे मेंटेनन्स, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी सर्व एका महिन्याच्या हिशोबाने करावे लागत असल्याने व्यापाऱ्यांची प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू आहे.
शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुद्धा दुकान सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास उत्पादन व विक्री साठी २५ टक्के अधिक कालावधी व्यापारी बांधवांना मिळेल व त्याची मदत आर्थिक ताण कमी करण्यासाठी होईल. पितृपक्ष संपल्यावर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक खरेदीसाठी घरा बाहेर पडतील. सात दिवसाचा आठवडा झाल्यास पाच दिवसांचा ताण सात दिवसांमध्ये विभागला जाईल. निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करणे हीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे.
त्यासाठी मार्केट ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे तसेच मार्केटवर अवलंबून असलेले हमाल, हातमजुरी करणारे कामगार, चालक-मालक इत्यादी सर्वांनाच दोन दिवस मार्केट बंद राहत असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शनिवार रविवारला दुकान सुरू ठेवण्याची परवानगी मिळाल्यास हातावर पोट असलेल्या माणसांना रोजगार मिळेल. इतर शहरांप्रमाणे जळगाव शहरातील शनिवार-रविवार दोन दिवस असलेली बंदी उठवून व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी जाहीर करावी व जळगावच्या चाललेल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी मागणी कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे, सचिव ललित बडिया यांनी केली आहे.