शत्रू हल्ल्यापेक्षा जवानांच्या आत्महत्या , मानसिक तणावात मृत्यू चिंताजनक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दरवर्षी सीमेवर शत्रुंचा हल्ला झाला नाही तरी किमान १०० भारतीय सैनिकांना आत्महत्या किंवा मानसिक तणावात जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

थिंक टँक युनायटेड सर्विस इंस्टिट्यूशन ऑफ इंडियाने ( यूएसआय) प्रकाशित केलेल्या भारतीय सैन्याविषयीच्या अहवालात हे सांगण्यात आलंय. या अहवालानंतर अनेक स्तरावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यूएसआयच्या अहवालात सांगण्यात आलं आहे, “भारतीय सैन्यातील जितके जवान शत्रूसोबत लढताना शहीद होत नाहीत, त्यापेक्षा अधिक जवान आत्‍महत्‍या आणि मानसिक तणावामुळे आपला जीव गमावत आहेत .

भारतीय सैन्यातील जवानांच्या स्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण एकिकडे देशाचं संरक्षण करण्यासाठी हे जवान रात्रंदिवस शत्रूवर नजर ठेऊन असतात. मात्र, दुसरीकडे याच जवानांवर कामाचा प्रचंड बोजा असल्याचंही समोर येतंय. कामाच्या तणावातून अनेक जवान आयुष्य संपवण्याचा टोकाचा मार्ग अवलंबत आहेत.

यूएसआयने केलेल्या या अहवालात जवानांमधील तणावाच्या कारणांपैकी एक कारण सातत्याने होणाऱ्या दहशतवादविरोधी कारवाया (काउंटर इंसर्जंसी किंवा काउंटर टेररिझम ऑपरेशन्स) हे आहे. या मोहिमांमुळे सैनिकांवर जीवघेणा तणाव येत आहे. या मोहिमांमध्ये सातत्याने अनुभवाला येणारं प्रचंड तणावपूर्ण वातावरण हे या आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे.

हे संशोधन कर्नल ए. के. मोर यांनी केलंय. कर्नल मोर २०१९-२०२० या काळात यूएसआयमध्ये सीनियर रिसर्च फेलो होते. ऑपरेशनल आणि नॉन ऑपरेशनल कारणांमुळे सैनिकांमध्ये तणाव निर्माण होत आहे हेही यात नमूद करण्यात आलंय. निम्म्याहून अधिक सैनिक तणावाच्या सावलीत आहेत असं वाटत असल्याचंही निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय.

भारतीय सैन्यात दरवर्षी आत्महत्या, सहकाऱ्याकडून हत्या किंवा इतर कारणांनी जीव जाणाऱ्या सैनिकांची संख्या शत्रूसोबत लढताना होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक आहे. मागील १५ वर्षांमध्ये संरक्षण मंत्रालयाने आणि सैन्याने तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यात. यानंतरही याचा आवश्यक परिणाम झालेला दिसत नाही. युनिट्स आणि सब युनिट्स तणावात आहेत. त्यामुळे या घटनांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. युनिट्समध्ये बेशिस्तपणा, ट्रेनिंगची खराब अवस्था, उपकरणांचं वाईट व्यवस्थापन आणि खचलेली मनःस्थिती याचा युद्धाच्या तयारीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांमध्ये तणाव असणाऱ्यामागील प्रमुख कारण नेतृत्वातील दोष हेच आहे. याशिवाय अतिरिक्त तणाव, कमी संसाधनं, सातत्याने होणाऱ्या पोस्टिंग, पोस्टिंग आणि प्रमोशनमध्ये होणारा भेदभाव आणि अपारदर्शकता, खराब राहण्याच्या जागा, आणि सुट्टी न मिळणं ही कारणंही आहेत. जुनिअर कमीशंड ऑफिसर्स (जेसीओ) किंवा इतर रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये तणावाचं मुख्य कारणं सुट्टी देण्यास उशीर करणे किंवा सुट्टी नाकारणे, अतिरिक्त काम, घरगुती प्रश्न, वरिष्ठांकडून होणारं शोषण, आदराची कमतरता, तर्कहीन कारणं देत मोबाईल फोनवर बंदी, मनोरंजनाच्या अपुऱ्या सुविधा, आणि सिनियर्स आणि जुनियर्समधील नाराजी ही आहेत.

हा अहवाल करताना तिन्ही दलांच्या प्रमुखांचीही मतं जाणून घेण्यात आलीत. सैन्यात दरवर्षी सरासरी १०० सैनिकांचा जीव आत्महत्या किंवा सहकाऱ्याकडून होणाऱ्या हल्ल्यात जात आहे. ही खूपच गंभीर बाब असून प्रत्येक तिसऱ्या जवानाचा जीव जात आहे. हे नुकसान भरुन येणं अवघड आहे.

Protected Content