शंभर वर्षापेक्षा जुना शेतातील रस्ता केला बंद; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथील हायवे बायपास जवळील शेतांमध्ये जाण्या-येण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शंभर वर्षापेक्षा जुन्या रस्त्यावर शैलेश कासट यांनी खड्डे खोदण्याचे सुरुवात करून स्थानिक शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याचा प्रतिबंध केल्याची घटना घडल्यानंतर त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शैलेश कासट यांनी काही वर्षांपूर्वी गट क्रमांक 111 खरेदी केला होता. या गटात त्यांनी प्लॉटिंग करण्यास सुरुवात केली. परंतु याच शेतातून इतर शेतांमध्ये जाण्यासाठी अत्यंत जुना पारंपारिक वहिवाट रस्ता असतानादेखील श्री कासट यांनी खड्डे खोदून शेतकऱ्यांचा रस्ता बंद केला. याप्रसंगी स्थानिक शेतकरी देविदास अण्णा पाटील यांच्यासह गोपाळ पाटील, योगेश बारी यांनी कासट यांना जुने कागदपत्र दाखवून रस्ता बंद न करण्याची मागणी केली असता कासट यांनी नकार दिला. त्याचबरोबर ‘तुम्हाला जिथे जायचं असेल तिथं जा.. राजकीय पुढाऱ्यांकडे देखील जाऊन पहा.. पण रस्ता मिळणार नाही’ अशी भाषा वापरली.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कासट यांचे संपूर्ण बांधकाम थांबवून कायदेशीर चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे नगर रचना विभागामार्फत जागेची पूर्व तपासणी न करता परस्पर मंजुरी कशी दिली गेली, यासंदर्भात देखील तक्रार करण्यात आलेली आहे.

Protected Content