व्यायाम शाळेत ग्रामपंचायत कार्यालय भरविण्यास युवकांचा विरोध

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील  सातगाव डोंगरी येथील ग्रामपंचायत इमारतीचे काम सहा वर्षापासून रखडले असून ग्रामपंचायतीला दप्तर ठेवण्यास स्वतःची जागा नसल्याने, येथेच असलेल्या व्यायामशाळेत ग्रामपंचायतीचे दप्तर हलविण्याची हालचाल सुरु आहे.  मात्र व्यायाम करणाऱ्या युवकांनी त्यास कडाडून विरोध दर्शविला आहे.

ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सातगावसह गहुले, तांडा या गावांचा समावेश येत असून, सात हजाराच्यावर लोकसंख्या आहेत. ग्रामपंचायतीची जुनी इमारत सहा वर्षांपूर्वी पाडून नवीन इमारत उभी करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला होता. मात्र पूर्ण पंचवार्षिक कालखंड निघून गेल्यावरही सदर इमारत उभी राहू शकली नाही. या इमारतीच्या तळमजल्याला गाळे बनविण्यात आले असून, गाळेधारकांकडून ॲडव्हान्स म्हणून पैसे घेण्यात आले आहेत. इमारतीच्या आराखड्यानुसार पहिल्या मजल्यावर भव्य असे ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचे नियोजित आहे. मात्र ते का होऊ शकले नाही ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सध्या मात्र तेरा नवनिर्वाचित सदस्यांची मीटिंग कोठे घेण्यात यावी हा प्रश्न आहे. म्हणून तात्पुरते ग्रामपंचायतीचे दप्तर व्यायाम शाळेत हलवण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र व्यायाम करणाऱ्या युवकांनी त्यास कडाडून विरोध केला असून, याबाबत ५२ युवकांची स्वाक्षरी असणारी तक्रार केली आहे. या युवकांनी पाचोरा गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आम्हा युवकांचा उत्साह यामुळे ना उमेद होऊ शकतो  असेही अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहेत. यासाठी युवकांनी शासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

 

 

Protected Content