जळगाव प्रतिनिधी । शहरातील कचरा संकलन व साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिलेला आहे. वॉटरग्रेसच्या कामाबाबत अनेक महिन्यांपासून मनपा सदस्यांकडून तक्रारी येत असून गेल्या काही दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रातून येत असलेल्या माहितीनुसार मक्तेदाराने अटी, शर्थींचा भंग केल्याचे दिसून येत आहे. वॉटरग्रेस कंपनी आणि कामकाजाची चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
जळगाव शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत वॉटरग्रेसचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. तसेच काही ठिकाणी कचरा संकलन ऐवजी ट्रॅक्टरमध्ये माती भरून वजन वाढविले जात असल्याचे लक्षात आले आहे. गेल्या काही दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार वॉटरग्रेस मक्तेदाराने उपमक्ता दिलेला असून साफसफाई आणि सर्व कामकाज त्या कंपनीकडून करीत असल्याचे तसेच वॉटरग्रेस कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे बँक खाते हाताळण्यात येत असल्यासह अटी शर्थींचा भंग करणाऱ्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. वॉटरग्रेस कंपनी आणि त्यांच्या कामकाजाची चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांची तक्रार
वॉटरग्रेसचे कर्मचारी कचरा संकलन करण्याऐवजी ट्रॅक्टरमध्ये माती भरत असल्याचा प्रकार बुधवारी महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे व भारत सपकाळे यांनी उघडकीस आणला. त्यांनी याबाबत तात्काळ महापौरांकडे तक्रार केली असता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ आयुक्तांना सदर प्रकार कळविला.