भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वेल्हाळे येथील वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळला असून बिबट्याची शिकार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी दोघांना वनविभागाने अटक केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील वेल्हाळे येथील वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळला असून बिबट्याची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर गोपनीय माहितीनंतर वेल्हाळा शिवारातून कोतवाल सद्या मोरे (४०) व कालू कोतवाल मोरे (२०) या पिता-पूत्रांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी घरातुन बिबट्याचे दात व हाडे काढून दिली आहे.
वेल्हाळा-वरणगाव वनपरीक्षेत्रात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक चि.रा. कांबळे, मुक्ताईनगरचे वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, वनपाल एल.डी.गवळी, वनरक्षक मुकेश बोरसे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी बिबट्याची केवळ कातडी व शेपूट आढळली तर नख व दात काढून नेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबट्याच्या शरीराच्या अवशेषांचे नमुने पीसीएमबी हैद्राबाद प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बिबट्याची शिकार झाली की अन्य कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला हे तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल .