वेगळ्या पद्धतीने बदनामीची भाजपची पूर्वीपासूनच पद्धत

नगर: वृत्तसंस्था । ‘एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनच पद्धत आहे. त्या आधारावरच मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत , अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे

तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, त्याच्या तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप व व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
आज नगरच्या सरकारी विश्रामगृहावर मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडेंनी फडणवीस यांनी केलेल्या, ‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत,’ या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले, त्यामध्ये त्यांनी धमकावणे कधी केले नाही. पण एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नाही, त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे, त्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्याने मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे सांगितले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, ते तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप, व्हिडीओ क्लिप पाहिले. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशारा मुंडे यांनी फडणवीस यांना दिला. ‘भाजप किती ताकदवान आहे, हे येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसेलच,’ असे स्पष्ट करतानाच भाजपला एकप्रकारे आव्हानच दिले.

‘राज्य सरकारच्या वर्षपूर्ती बद्दल बोलताना मंत्री मुंडे म्हणाले, ‘महाराष्ट्रात पहिल्यांदाच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. लोकशाहीला नवीन ओळख शरद पवार यांनी या निमित्ताने करून दिली. ६४ आमदार असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असणाऱ्या पक्षाचे उपमुख्यमंत्री, तर ४४ आमदार असणाऱ्या पक्षाचे मंत्री झाले. तर १०५ आमदार असणाऱ्या पक्षाचे विरोधी पक्षनेते झाले. हे लोकशाहीचे फार मोठे चित्र शरद पवार यांनी देशाला दाखवले, व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले,’ असं ते म्हणाले आहेत.

‘गेल्या एक वर्षाच्या काळात अनेक संकटे आली, त्यात सर्वात मोठे संकट कोरोना होते. या संकटाला तोंड देत महाराष्ट्राच्या जनतेचे आरोग्य सांभाळत, विकासाची सांगड घालत सरकारने एक वर्ष पूर्ण केले या काळात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. काही निर्णय, काही कामे आम्हाला सर्वदूर महाराष्ट्रात सुरू करायची होती. पण केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे थोडे आर्थिक निर्बंध आले. या आर्थिक निर्बंधांमुळे ज्या गतीने महाराष्ट्राचा विकास गेल्या एक वर्षाच्या काळात करायचा होता, ती गती मात्र मंदावली,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Protected Content