जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वृद्धाला रिक्षात बसवून स्वातंत्र्य चौक ते न्यायालयादरम्यान खिसा कापल्याचा प्रकार 17 जुन रोजी घडला, होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून संशयीत रिक्षा चालकाला अटक केली आहे. गुन्ह्यातील त्याच्या तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली असुन त्याचा शोध सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, नांद्रा (ता. जामनेर) येथील वामन सीताराम पाटील (वय 78) सोमवारी (ता. 17) जळगावात आले होते. स्वातंत्र्य चौकातून ते टॉवर येथे जाण्यासाठी त्यांनी त्या मार्गावर धावत असलेल्या रिक्षाला हात दिला, तीन तरुण पूर्वीपासूनच बसलेले असताना रिक्षाचालकाने वामन पाटलांना रिक्षात बसवून घेतले. रिक्षात बसलेल्या तिघा तरुणांनी स्वातंत्र्य चौक ते न्यायालय चौक दरम्यान रिक्षातच बसण्याच्या कारणावरून आपसांत मस्करी करीत अंगलट करून वामन पाटलांच्या खिशातील पाकीट लांबविले. टॉवर चौकापर्यंत घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकानेही पाटील यांना कोर्ट चौकातच उतरवून भाडे न घेताच त्यांना सोडून देत रिक्षा पिटाळली होती. खाली उतरल्यावर खिशाची चाचपणी केल्यावर रक्कम चोरीला गेल्याचे वामन पाटील यांच्या लक्षात आले.जिल्हापेठ पोलिसांत दाखल या गुन्ह्यात संशयीतांची नावे निष्पन्न झाली असून सहाय्यक निरीक्षक संदिप अराक यांच्या पथकातील नाना (छगन)तायडे, प्राशांत जाधव, अविनाश देवरे, शेखर जोशी, जितु सुरवाडे, अजित पाटील, फिरोज तडवी या पथकाने गुप्त माहितीच्या अधारे गुन्ह्यात सहभागी रिक्षाचालक बंटी ऊर्फ प्रद्युम्न महाले(19.रा.पिंप्राळा) यास अटक केली आहे. गुन्ह्यातील त्याच्या तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहे.