चाळीसगाव: प्रतिनिधी । सध्या कोरोनाकाळात सर्वत्र संचारबंदी आहे. पोकरा योजनेसाठी ग्रामसभा घेता येत नसल्याने ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करता येत नव्हती. मात्र आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने शासनाने ऑनलाइन विशेष ग्रामसभा घेण्यास मंजुरी दिली आहे.
कोरोनाने उभ्या राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतीला सहाय्य ठरलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) या योजनेसाठी अद्यापपर्यंत ग्रामसभा घेता येत नव्हती. ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापनही करता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपूरक अनुदान रखडले होते.
याबाबत आ. मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना वेळोवेळी पत्राद्वारे कळविले जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला. परिणामी शासनाने ऑनलाइन विशेष ग्रामसभा घेऊन नवीन ग्राम कृषी संजीवनी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतकरीपुत्राच्या स्वरूपात आ. मंगेश चव्हाण भेटला आहे. अशी प्रतिक्रिया ठिकठिकाणाहून उमटत आहे.