चोपडा प्रतिनिधी । जळगाव-भोकर-खेडीभोकरी या रस्त्यावरील पुलासाठी तब्बल १११ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून विरोधकांना आमचे विकासाचे ‘चॅलेंज’ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. येथील उपजिल्हा रूग्णालयातील कार्यक्रमात ते बोलत होते.
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते डायलिसिस विभाग व नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे लोकार्पण झाले. यावेळी ना. पाटील म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित पडलेला खेडीभोकरी ते भोकर हा तापी नदीवरील पूल व्हावा, ही जनतेची मागणी आहे. आमचे देखील ते स्वप्न होते. त्यामुळे १११ कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या प्रस्तावावर आजच मंजुरीची अंतिम स्वाक्षरी झाली. जळगाव-भोकर-खेडीभोकरी या चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर विरोध देखील तोंडात बोटे घालतील. विरोधकांना आपले विकासाचे चॅलेंज आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, यापूर्वीच्या पालकमंत्र्याकडे स्पेशल खाते व होलसेल अधिकार होते, तरीही जळगाव सामान्य रुग्णालयाची काय दशा होती? तेव्हा या रुग्णालयात केवळ सात व्हेंटिलेटर होते, आज ही संख्या १०० पर्यंत आहे. पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी कामे केली असती तर मला काम करण्याची गरज पडली नसती.