मुंबई प्रतिनिधी । ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’सह अनेक मानाचे किताब जिंकणाऱ्या शरीरसौष्ठवपटू अली सलोमनी याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
बॉडीबिल्डर अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक विवंचनेत असल्याचे म्हटले जाते. आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिंतेतूनच अलीने टोकाची पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अलीच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
अलीने सलोमनी याने आज (शुक्रवार 31 जानेवारी) सकाळी 9 वाजेच्या घरात कोणीही नसतांना आत्महत्या केली. गळफास घेऊन अलीने आपले आयुष्य संपवले. पत्नी घरी आल्यानंतर तिला अली बेडरुममधील पंख्याला लटकलेला दिसल्याने हा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
बॉडीबिल्डर अली सलोमनी याने तीन वेळा ‘वसईश्री’, एकदा ‘दहिसरश्री’ आणि ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ या स्पर्धांचा किताब पटकावला होता. गेल्या अनेक वर्षांपासून अलीने अनेक तरुणांना शरीरसैष्ठ स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. सध्या तरी विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.