जळगाव प्रतिनिधी । शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाचा नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महसुल विभागाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, प्रसाद मते, तुकाराम हुलवळे, शुभांगी भारदे, किरण सावंत, राजेंद्र वाघ, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश यांच्यासह महसुल व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त गमे यांनी मतदार यादी पुन:रिक्षण कार्यक्रम, रोजगार हमी योजनेमार्फत सुरु असलेल्या कामावर स्थानिक मजूरांना कामे उपलब्ध करुन देणे, मनेरगातंर्गत अपूर्ण विंधन विहिरींचे कामे पूर्ण करणे, शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना,आधार सिडींग आदि विविध योजनामार्फत सुरु असलेले धान्य वाटप, शिवभोजन योजनेचा आढावा घेतला. शासकीय जमीन महुसल वसुल व गौण खनिजच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी. वाळू घाटांचा लिलावाचा आढावा घेऊन याबाबत लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करावे. सातबारा फेरफार, अर्धन्यायिक प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, महाराजस्व अभियान, प्रलंबित परिच्छेदांचे अनुपालन आदिंचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना केल्यात.