अँटीबॉडीच्या भरवशावर राहणे घातकच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार झाल्याने कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होते,’ असे खात्रीशीर सांगता येत नसल्याचे मत शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, बहुसंख्य जणांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांमुळे हे शक्य आहे, असा निष्कर्ष काढला जात असतानाच शास्त्रज्ञांनी मात्र त्यावर अवलंबून न राहण्याचा इशारा दिला आहे.

शरीरात प्रतिपिंडांची निर्मिती होणे याचा अर्थ संबंधित व्यक्तीला संसर्ग झाला आहे, एवढेच केवळ खात्रीशीर सांगता येते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय रोगप्रतिकारशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले, ‘शरीरात प्रतिपिंडांची निर्मिती झाल्याने संबंधित व्यक्तीच्या शरीरातील आजाराची नेमकी स्थिती कळू शकत नाही. आणखी काही काळ वाट पाहून निरीक्षणे नोंदवण्याची गरज आहे.’

‘भारत औषधी घटकांच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. सध्या ही प्रक्रिया चिनी मालाच्या पुरवठ्यावर अवलंबून असली, तरी आगामी काळात औषधी घटकांची निर्मिती संपूर्णत: स्वदेशी पद्धतीने व्हावी, यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत,’ असे निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले. चौदाव्या वार्षिक बायोफार्मा आणि आरोग्य सेवा परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भारत त्याच्या औषधनिर्माण व्यवस्थेत नावीन्यपूर्ण बदल वेगाने करत असून, नव्या लशींचे वेगवान उत्पादन आणि औषधांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे.’

सलग दोन दिवस रोज ९० हजारांवर नवीन रुग्णांची नोंद होत असताना, मंगळवारी मात्र दिवसभरातील नवीन रुग्णांची संख्या ७५ हजार ८०९ नोंदवली गेली. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ४२ लाख ८० हजार ४२२ वर गेली. मात्र दिवसभरात आजवरचे सर्वाधिक,म्हणजे एक हजार १३३ करोना मृत्यू नोंदवले गेल्याने एकूण जीवितहानी ७२ हजार ७७५ वर पोहचली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत पाच कोटी सहा लाख ५० हजार १२८ करोना चाचण्या झाल्या आहेत. १० लाख लोकसंख्येमागे केवळ तीन हजार २०१ करोना रुग्ण आहेत. हे प्रमाण जगभरातील नीचांकी प्रमाणापैकी आहे. भारतात १० लाख लोकसंख्येमागे ५३ कोरोनामृत्यू झाले आहेत. जागतिक सरासरी ११५ आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली.

देशातील एकूण मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आहेत.
===============

Protected Content