पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात विना परवानाधारक रिक्षा व पॅजो रिक्षा या वाहनांचा सुळसुळाट झाल्याने अशा अवैधरित्या विना परवाना धारक वाहनांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई व्हावी. अशा आषयाचे निवेदन पाचोरा येथील एकता अॅटो रिक्षा चालक-मालक युनियनतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले.
निवेदन देते प्रसंगी एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदनशिव, उपाध्यक्ष सुधाकर महाजन, सुनिल शिंदे, सचिव नाना चौधरी, सहसचिव अनिल लोंढे, कोषाध्यक्ष अशोक निंबाळकर, उपकोषाध्यक्ष गणेश पाटील, सदस्य प्रविण माने उपस्थित होते.
शहरात विनापरवाना रिक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच पॅजो रिक्षांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले असुन पाचोरा येथील एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनतर्फे जुन – २०२२ मध्ये अशा रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी म्हणून प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. तसेच आंदोलन देखील करण्यात आले होते. परंतु या विषयाकडे प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. या विनापरवाना (अवैधरित्या) व्यवसाय करणाऱ्या वाहनांमुळे परवानाधारक रिक्षा चालकांवर व त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. परवाना धारक चालकांनी बॅंक, पतपेढी, फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेवुन रिक्षा घेतल्या आहेत. मात्र अवैधरित्या सुरु असलेल्या वाहनांमुळे परवाना धारक रिक्षा चालकांना हे कर्ज फेडणे देखील शक्य होत नाही. अशा विनापरवाना (अवैधरित्या) वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा लवकरच एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (जळगांव), पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आ. किशोर पाटील, मा. आ. दिलीप वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, पाचोरा पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना देण्यात आल्या आहेत.