विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीची तातडीची बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, याबाबतच तोडगा काढण्यासाठी या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये आज सायंकाळी तातडीची बैठक होणार आहे.

 

 

महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार असून यामध्ये दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र, काँग्रेस दोन उमेदवार देण्यासाठी अडून बसली आहे. यामुळे उद्धव ठाकरेच नाराज झाले असून त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निरोप काँग्रेसच्या नेत्यांकडे पोहोचविल्याची चर्चा आहे. आता हा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Protected Content