जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असणार्या भोंगळ कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी फुग्यांना छोटी प्लॅस्टिक खुर्ची लावून हवेत उडवून खूर्ची छोडो अशी मागणी करण्यात आली. फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे राज्य अध्यक्ष भूषण भदाणे यांच्यासह याप्रसंगी माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, स्वप्निल नेमाडे आदींची या वेळी उपस्थिती होती.
दरम्यान, विद्यापीठात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत १६ मुद्द्यांवर खुलासा करण्याची मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. यात प्रा.डॉ सुधीर भटकर यांच्या प्रकरणातील चौकशी समिती आहे की नाही, याची माहिती देण्यात यावी; कुलगुरूंनी खुल्या चर्चेला बोलवावे. निवृत्त न्यायाधिश व्यवहारे यांनी कुणाच्या जाचाला कंटाळून चौकशी अधिकारी पदाचा राजीनामा दिला, याचा खुलासा करावा. विद्यापीठाच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेतून जनता बँक येथे का ठेवण्यात आल्या. पुर्नतपासणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे. विषय तज्ज्ञ यांच्या नियुक्त्या कोणाच्या सांगण्यावरून रद्द केल्या यांच्यासह विविध मागण्या या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व फार्मसी स्टुडंट कौन्सिलतर्फे केल्या.