विद्यापीठ देणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ नवउद्योजकांना प्रशिक्षण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ नवउद्योजकीय संकल्पनांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राद्वारे निवड करण्यात येणार असून  त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

 

विद्यापीठात कौशल्यविकास आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. खान्देशात उद्योजकीय विस्तार व्हावा, तरूण उद्योजकांना व विशेषत: महाविद्यालयांमध्ये शिकतांना उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणांना या इन्क्युबेशन सेंटर मार्फत सर्व प्रकारची मदत दिली जाते. या केंद्रातंर्गत प्रत्येक महाविद्यालयात इनोव्हेशन ॲन्ड एंटरप्रेणरशिप डेव्हलपमेंट सेल स्थापन करण्यात आले आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त या इन्क्युबेशन केंद्राकडून ७५ उद्योजकीय नवसंकल्पनांची निवड केली जाणार आहे. अशा संकल्पनांमधूनच स्टार्टअप सुरु होऊ शकतील असा विद्यापीठाला विश्वास असल्यामुळे कुलगुरु प्रा. व्ही.  एल. माहेश्वरी यांनी या अमृत महोत्सवी वर्षात ७५ जणांच्या या संकल्पनांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी आदी घटक या नवसंकल्पना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरकडे १५ ऑगस्टपर्यंत https://forms.gle/ Mh1ohBTxiopRktKn8या लिंकवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन  प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले आहे.

Protected Content