जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने लाखो रुपयांची लाच घेऊन व आर्थिक देवाण-घेवाण करून भुसावळ येथील कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा कार्यकाळ २०१७ मध्ये संपूनही अजून नियुक्ती कायम केली आहे असा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्न भुसावळातील पी.के.कोटेचा महाविद्यालयात शासन निर्णयानुसार प्राचार्यपदी डॉ. मंगला साबद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार डॉ. मंगला साबद्रा यांना ८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्राचार्यपदाचा पदभार दिला गेला. मात्र पाच वर्ष होवून मुदत संपल्यानंतरही विद्यापीठाने डॉ. मंगला साबद्रा यांना प्राचार्यपदावर नियुक्त ठेवले आहे. जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने लाखो रुपयांची लाच घेऊन व आर्थिक देवाण-घेवाण करून डॉ. मंगला साबद्रा यांना पी.के. कोटेजा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याप्रमाणे प्राचार्य पदाची मुदत संपल्यानंतर देखील प्राचार्य पदी नियुक्त ठेवले असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी माहितीच्या अधिकारान्वये मागविलेल्या माहितीनुसार डॉ. मंगला साबद्रा यांनी मुलाखत घेतेवेळी स्वतःचा API म्हणजेच शैक्षणिक कामगिरी निर्देशांक की जो मुलाखत घेते वेळी उमेदवाराने सोबत ठेवावा लागतो तो देखील उपलब्ध नव्हता.
विद्यापीठाच्या मुलाखत घेणाऱ्या समितीला हाताशी धरून व आर्थिक देवाण-घेवाण करून डॉ.मंगला साबद्रा यांचा शैक्षणिक कामगिरी निर्देशांक नंतर बनवण्यात आला. विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहार विरोधात आधीच लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान, प्राचार्यपदावरून डॉ. मंगला साबद्रा यांना हटविण्यात यावे अन्यथा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देवेंद्र मराठे यांनी केला आहे.