जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासात भारत आणि भारताचा विकास हाच मुख्य विचार केंद्रस्थानी होता असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक दीपक गायकवाड यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डॉ.गायकवाड यांचे “राष्ट्र उभारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.म.सु.पगारे, प्रा. आर.जे. रामटेके, डॉ.निशा गायकवाड, समन्वयक प्रा.रमेश सरदार यांची उपस्थिती होती. प्रा.गायकवाड म्हणाले की, राष्ट्रीय व सामाजिक चळवळी या देशाच्या विकासात समांतर राहिल्या आहेत. बहिष्कृत भारत ते प्रबुध्द भारत या प्रवासात भारत हा शब्द केंद्रस्थानी ठेवला. जिथे जिथे भारतीय संस्कृतीची पेरणी करता येईल ती त्यांनी केली. महाविद्यालय उभारतांना मिलिंद, सिध्दार्थ, नागसेन या नावांमधून हे दिसून येते. भारताला त्यांनी राज्यघटना दिली. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. यातून त्यांचे राष्ट्रप्रेम दिसून येते असे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजही देशाच्या प्रगतीसाठी गरज आहे. ते दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. शिक्षणा शिवाय प्रगती होणार नाही. याची त्यांना जाणीव होती. शिक्षण हे व्यक्तीमत्व आणि दृष्टिेकोनात परिवर्तन घडवून आणते असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करण्याचे आवाहन कुलगुरुंनी केले.
यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक धवल सुर्यंवशी (रसायनशास्त्र प्रशाळा), व्दितीय- सुवर्णा भालोदकर (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा), तृतीय- ज्योती सोनवणे (शिक्षणशास्त्र प्रशाळा) हे पारितोषिक विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र सामुद्रे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अभय मनसरे यांनी करुन दिला. प्रा.म.सु.पगारे यांनी आभार मानले.
जल्लोषात मिरवणूक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यापीठात सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषेत समाधान वाघ, शालिनी मोरे, फैजान पटेल आणि कविता ठाकरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशासकीय इमारतीजवळ या मिरवणूकीचा समारोप झाला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, सीए रवींद्र पाटील, एस.आर.गोहिल, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, प्रा.रमेश सरदार, प्रा. अजय पाटील, अजमल जाधव, राजू सोनवणे, , संजय सपकाळे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, भैय्या पाटील, महेश पाटील आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.