जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील हिंदी विभागाच्यावतीने १९ व २० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय हिंदी चर्चासत्र व भारतीय हिंदी परिषद प्रयागराजच्या ४६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदी विभाग भारतीय हिंदी परिषद, प्रयागराज व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. १९ रोजी सकाळी १०:३० वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ला यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असतील. यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शितला प्रसाद दुबे, प्रशाळेचे संचालक प्रा. मुक्ता महाजन यांची प्रमख उपस्थिती राहिल. उद्घाटन सत्रात हिंदी परिषद प्रयागराजच्यावतीने प्रा. जी. गोपीनाथन, प्रा. शशीभूषण पांडेय, प्रा. सदानंद गुप्त, प्रा. सुरेन्द्र दुबे, प्रा. रामकिशोर प्रयागराज, डॉ. रमेशचंद्र शर्मा, प्रा. लक्ष्मीनारायण भारतव्दाज, प्रा. टी. सी. गोयल यांचा हिंदी सेवेबद्दल सन्मान केला जाणार आहे.
उद्घाटनानंतर सुप्रसिध्द साहित्यिक सुर्यप्रसाद दीक्षित (लखनऊ) यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. रामेश्वर मिश्रा हे बीजभाषण करतील. त्यानंतरच्या सत्रात हिंदी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. रामकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्रात होणार असून यात डॉ. मानववेंद्र पाठक, डॉ. अखिलेशकुमार शंखधर, डॉ. विनयकुमार शर्मा, डॉ. मलखान सिंह हे शोधनिबंध वाचतील. दुस-या सत्रात डॉ. निर्मला अग्रवाल, डॉ. विश्वास पाटील, प्रा. सजीव दुबे, डॉ. कामिनी ओझा, दिपेन्द्र जाडेजा, डॉ. नवीन नोंदवाना हे सहभागी होतील.
सोमवार २० मार्च रोजी दिवसभर चर्चासत्र होणार असून त्यानंतर भारतीय हिंदी परिषदेच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. समारोप समारंभाला डॉ. श्रीराम परीहार, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. किरण हजारीका, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती या चर्चासत्राचे संयोजक व हिंदी विभागप्रमुख प्रा. सुनील कुलकर्णी यांन दिली.