जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्रविद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशनअँड लिंकेजेस केंद्राच्यावतीने २३ विद्यार्थ्यांच्या नवउद्योजकीय कल्पना निवडण्यात आल्या असून येत्या २ ते ४ जानेवारी या कालावधीत या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन अँडलिंकेजेस (केसीआय आयएल) केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांकडून, जे नवउद्योजक होऊ इच्छित आहेत त्यांच्याकडून उद्योग सुरू करण्याबाबतच्या नव्या कल्पना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या या प्रवेशिकांमधून विद्यापीठाने २३ विद्यार्थ्यांची निवड तज्ज्ञ मंडळींकडून केली आहे.
रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात आणि स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी हे केंद्र सातत्याने प्रयत्न करीत असून काही नवउद्योजक तयार झाले आहेत. या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठीच्या प्रक्रियेत मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे केंद्राच्या वतीने दिनांक २ ते ४ जानेवारी या काळात विद्यापीठात निवासी कार्यशाळा आयोजित केली आहे. उद्योजकता विकासाच्या नवकल्पना आणि स्टार्टअप या संदर्भात त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. व्याख्यान आणि गटचर्चा असे स्वरूप राहणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. या तीन दिवसात छबीराज राणे, डॉ. विवेक काटदरे, डॉ. युवराज परदेशी, आशुतोष जहागीरदार, उपल सिन्हा, आशुतोष प्रचंड, गोविंद सोनवणे, राकेश कासार आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. केंद्राचे संचालक डॉ. भूषण चौधरी हे नवकल्पनांची माहिती देतील तर केंद्राची ओळख संचालक डॉ. विकास गीते करून देतील. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या उपस्थितीत बुधवारी समारोप होईल अशी माहिती विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजेसचे संचालक डॉ. राजेश जावळीकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश मल्होत्रा यांनी दिली.