विद्यापीठातील डॉ. बेंद्रे व डॉ. गीते यांची फेलोसाठी निवड

 

जळगाव, प्रतिनिधी । विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र ॲकेडमी ऑफ सायन्सेसच्या वतीने देशातील २४ ज्येष्ठ वैज्ञानिकांची फेलो म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. रत्नमाला बेंद्रे आणि डॉ. विकास गीते यांचा समावेश आहे.

संशोधन क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राशी नाते असलेल्या देश-विदेशातील प्रतिभावान वैज्ञानिकांचा महाराष्ट्र ॲकेडमी ऑफ सायन्सेसच्या वतीने फेलो म्हणून सन्मान केला जातो. हि निवड प्रक्रीया तज्ञ समितीमार्फत केली जाते. २४ ज्येष्ठ वैज्ञानिकांची फेलो म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेतील डॉ. रत्नमाला बेंद्रे आणि डॉ. विकास गीते यांचा समावेश आहे. डॉ. बेंद्रे यांनी सहा संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून रासायनिक किटक नाशकांऐवजी नैसर्गिक घटक वापरून किटक नियंत्रण आणि नैसर्गिक औषधी घटकांच्या सहायाने कर्करोग व टी.बी. यावर उपयोगी औषधी याबाबतीत त्या संशोधन करीत आहेत. १९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली आहे. डॉ. विकास गीते यांनी पॉलीमर केमिस्ट्री या विषयात संशोधन केले असून एक वर्ष दक्षिण कोरीयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ६० शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. यापूर्वी विद्यमान कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी, प्रा. व्ही. एल. माहेश्वरी आणि प्रा. भूषण चौधरी यांना हा बहुमान प्राप्त झालेला आहे. फेलो म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. बेंद्रे व डॉ. गीते यांचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्रा.पी. पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार तसेच इतरांनी अभिनंदन केले.

Protected Content