विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांसाठी प्रस्तावाचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने या शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांचे महाविद्यालयात आयोजन करण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून या वर्षी काही नव्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अग्निवीर सैन्यदल भरती प्रशिक्षण कार्यशाळा, आत्मनिर्भर युवती अभियान, मिशन साहसी उपक्रमांचा समावेश आहे.

 

विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी सर्व महाविद्यालये व परिसंस्थांना या उपक्रमांचे संयोजकत्व स्वीकारण्यासाठीचे आवाहन करणारे पत्र पाठविले आहे. नृत्य कौशल्य, नाट्य कौशल्य, साहित्य कौशल्य, संगीत कौशल्य, ललित कला अभ्यास कौशल्य, संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा, प्रश्नमंजूषा, एकांकीका स्पर्धा, भावगीत गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, विद्यापीठस्तरीय श्रम व नेतृत्व विकास कार्यशाळा, मैत्री कार्यशाळा, साहस कार्यशाळा, बहिणाबाई चौधरी विद्यार्थी साहित्य संमेलन, युवारंग युवक महोत्सव, दिव्यांग कला महोत्सव आदींचा समावेश आहे. याशिवाय विशेष उपक्रमांअंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान, अग्नीवीर पुर्व प्रशिक्षण अभियान, युवती सभा, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना आदींचा यामध्ये समावेश आहे.

 

या कार्यक्रमांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून अर्थसहाय्य केले जाते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी हे उपक्रम उपयोगी ठरतात. पुर्वी एक दिवसाच्या होणाऱ्या कार्यशाळा आता तीन दिवसीय करण्यात आल्या आहेत. राजभवनाच्या सुचनेनुसार काही नवीन कार्यशाळा होणार आहे. महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान, वृक्षमित्र अभियान, नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान आदींचा यात समावेश आहे. यावर्षीचे प्रस्ताव केवळ गुगल लिंकद्वारेच स्वीकारले जाणार असून त्यासाठी विभागाने गुगल फार्म तयार केला आहे. https://forms.gle/8vVaE9uXgCxy2acQA या लिंक द्वारे २५ ऑगस्ट अथवा त्यापुर्वी हे प्रस्ताव पाठविणे गरजेचे असल्याचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Protected Content