जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा सदस्यांसाठी २९ जानेवारी, २०२३ रोजी मतदान होणार आहे. गुरूवारी विद्यापीठाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदार यादी सोमवार दि. २६ डिसेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. गुरूवार दि. २९ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक ११ व १२ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पदवीधर गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. प्राप्त अर्जांची छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची यादी दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होईल. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वैध-अवैध उमेदवारी अर्जाबाबत कुलगुरूंकडे अपील दाखल करता येईल. १८ जानेवारी रोजी कुलगुरू अपीलाबाबत निर्णय घेतील. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २० जानेवारीला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि रविवार दि. २९ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत मतदान हाईल. बुधवार दि. १ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधरांमधून १० जागा असणार आहेत. त्यामध्ये खुल्या संवर्गातून ५ जागा, अनुसूचित जाती संवर्गातून एक, अनु. जमाती संवर्गातून एक, विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गातून एक, इतर मागासवर्ग संवर्गातून एक आणि महिला संवर्गातून एक जागा राखीव आहेत.