विठ्ठलवाडीत बंद घर फोडून पावणे चार लाखाचा ऐवज लांबविला; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विठ्ठलवाडीतील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे  उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की पंकज मगन मेहेते रा. विठ्ठलवाडी पिंपळा परिसर हे पत्नीसह वास्तव्याला आहे. २ मार्च रोजी दुपारी २ वाजता पंकज मेहेते हे पत्नीसह घराला कुलूप लावून मुंबईला कामाच्या निमित्ताने निघून गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ६ हजार रुपयांची रोकड असा ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पंकज मेहेते यांनी त्यांचे मेहुणे देविदास अमृत जाधव रा. आनंदमित्र कॉलनी पिंप्राळा यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगतले. त्यानुसार देवीदास जाधव यांनी तातडीने शालक पंकज मेहेते यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडलेले आणि घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसून आले. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. देविदास अमृत जाधव (वय-४०, रा. आनंद मित्र कॉलनी पिंप्राळा) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार ३ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .पुढील तपास रामानंदनगर पोलिस कर्मचारी करीत आहे.

Protected Content