भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध व सर्वात जुन्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ८७.७ किमी धावून भुसावळसह जिल्ह्याचे नाव उंचावणारे डॉ. तुषार पाटील यांचा भुसावळ स्पोर्ट्स ऍण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंतर्फे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्रमुख प्रा. प्रविण फालक यांनी डॉ. तुषार पाटील यांना शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. तुषार पाटील म्हणाले, की मी ही मॅरेथॉन केवळ कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे व भुसावळ स्पोट्स अँण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंच्या सदिच्छांमुळे यशस्वीपणे निर्धारीत वेळेत पूर्ण करू शकलो. त्यामुळे हा त्यांचा विजय आहे. रनर्स गृप मुळे माझी विशेष ओळख आहे असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत दक्षिण आफ्रिकेला गेलेले व या मॅरेथॉनमध्ये सर्व भारतीय धावपटूंसाठी धावदूत ठरलेले विकास पाटील व संतोष गवळे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. अनौपचारीक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. तुषार यांच्या धर्मपत्नी डॉ . चारुलता पाटील यांना देखील डॉ. निलिमा नेहेते, स्वाती फालक व पूनम भंगाळे या महिला धावपटूंनी सन्मानित केले.
गुरुवारी भुसावळ स्पोर्टस ऍण्ड रनर्स असोसिएशनचे नियमित धावण्याचे सत्र संपल्यानंतर सकाळी ठिक ६:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रविण फालक व महेंद्र पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील व आभार डॉ. चारुलता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र ठाकूर, शेख रिझवान, पारुल वर्मा, छोटू गवळी, विकी खडसे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रविण वारके, रणजित खरारे, सचिन अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, गणसिंग पाटील, विजय फिरके, संजय भदाणे, जितेंद्र चौधरी, सीमा पाटील, पुष्पलता चौधरी, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, दिपा स्वामी, आरती चौधरी, स्वाती भोळे , ममता ठाकूर, स्नेहा महाजन, नीलांबरी शिंदे आदी धावपटू उपस्थित होते.