वा. ना. उत्पात यांचे पुण्यात निधन

पंढरपूर वृत्तसंस्था । संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेत मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे कोरोना संसर्गामुळे पुण्यात उपचारदरम्यान आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

वा. ना. उत्पात हिंदुत्वावादी होते. वा ना या टोपण नावाने ते राज्यात ओळखले जात होते. प्रखरपणे विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. वा ना यांच्या जाण्याने चालत बोलता ज्ञानकोश गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. वा. ना. उत्पात यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला सावरकर साहित्याचा प्रसारही केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव होते. त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. ते पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.

उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक होते. त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली भागवत कथा सांगून मिळालेल्या उत्पन्नातून सावरकर क्रांती मंदिराची वास्तू त्यांनी उभारली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. वा ना हे रुक्मिणी मातेचे पुजारी होते व उत्पात समाजाचे चेअरमन होते. त्यांच्या पश्चाहत चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

पंढरपुरातील अनेक मान्यवर व्यक्तींना कोरोनाविरुद्ध लढाईत प्राणास मुकावे लागले आहे. यात माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर आणि आता वा. ना. उत्पात यांचेही कोरोनाने निधन झाले.

Protected Content