पुणे : वृत्तसंस्था । आषाढी वारी वाहनातून करण्याबाबत प्रमुख दहा मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांनी मान्यता दर्शवली आहे.
प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढवावी, रिंगण सोहळा, पालख्यांच्या सेवेकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास परवानगी मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत निर्णय होणार आहे.
मानाच्या पालख्यांचे प्रमुख आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला मानाच्या पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वारकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत प्रशासन अनुकूल असून अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबतच्या बैठकीतच होणार असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे म्हणाले, ‘शासनाने पायी वारीबाबत प्रसृत केलेल्या आदेशात काही त्रुटी होत्या. या त्रुटी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडय़ांचे प्रतिनिधित्व विणेकरी करत असतात. प्रत्येक दिंडीच्या एका प्रतिनिधीला प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची मुभा मिळावी, गोल व उभे रिंगण सोहळ्यातील अश्वाला महत्त्व असते, त्यांनाही मान मिळावा, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. शिवाय इतर मागण्या लेखी स्वरूपात प्रशासनाला दिल्या आहेत.’
मानाच्या पालख्यांसोबतच्या मानकऱ्यांशिवाय पाच ते सहा सेवेकऱ्यांना नियमांचे पालन करून पंढरपूरकडे जाण्यास परवानगी द्यावी. पालखी प्रस्थान सोहळ्यातील मानकऱ्यांचा मान मिळण्यासाठी या सोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येत वाढ करावी. पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरातील दर्शनासाठीच्या संख्येत वाढ करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत , असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले .