वाहनांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग मक्तेदाराकडून करा – राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील स्वच्छतेचा मक्ता वॉटर ग्रेस या कंपनीला देण्यात आलेला आहे. या मक्तेदाराला कचरा वाहतूक व संकलनासाठी १४३ नवी वाहने महापालिकेने विनामूल्य दिले होते. मात्र, या वाहनांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग मक्तेदाराकडून करून घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला कचरा वाहतूक व संकलन कामी स्वतःची मालकीची १४३ नवी वाहने विनामूल्य दिली आहेत. धुळे मनपाने याच वॉटरग्रेस कंपनीला धुळे मनपा मालकीची वाहने भाडे तत्वावर व किलोमीटर दराने दिलेली आहेत. परंतु जळगाव महापालिका मक्तेदारावर मेहरबान असल्याने ७-८ कोटीची नवनविन वाहने वॉटर ग्रेसला मोफत देवून जनतेच्या व शासनाच्या पैश्यांची उधळपट्टी केली आहे. एवढे सर्व बेकायदेशिरपणे घडत असतांना गेल्या दोन वर्षापासून सर्वच वाहनांचा सर्व्हिसींग कालावधी निघून गेला. या दोन वर्षात कंपनीकडून करण्यात येणारी मोफत सर्व्हिसींग कालावधी देखील निघून गेलेला असल्याने आता रोखीने सर्व्हिसींग करण्यासाठी एक कोटी रुपयांचा भूर्दंड बसणार आहे. हा भूर्दंड मनपाच्या माथी मारण्याचा मनसुबा वॉटरग्रेस कंपनीने केला असून आजपावेतो ४० ते ५० वाहन ही नादुरुस्त आहे. पण वॉटरग्रेस मक्तेदार ते दुरुस्त करणेकामी कानाडोळा करीत असल्याने कचरा संकलन व वाहतूकीला अडसर होत आहे. तो बोजा मनपाच्या तिजोरीवर पडणार आहे. सदर वाहनाच्या फिटनेस संदर्भातही वॉटरग्रेस ने कोणतीही दखल घेतलेली नसल्याने मनपा प्रशासन तोही खर्च करत आहे. वास्तविकः हा भुर्दंड ही मक्तेदारावर पडला पाहिजे व मनपाने त्यास आदेशित करुन त्याच्या बिलातून सदर रक्कम वसूल करावी. फिटनेसची (योग्यता प्रमाणपत्र) मुदत संपल्याने आर.टी.ओ. विभागाकडून काही वाहने जप्त केली आहेत, परंतु अशा वाहनांमुळे जिवीतहानी झाल्यास मनपा वर कायदेशिर कारवाई होऊ शकते. याकरिता मनपा प्रशासनाने मक्तेदारास कायदेशिर नोटीस देऊन वाहन दुरुस्ती व योग्यता प्रमाणपत्राकरिता येणारा सर्व खर्च वॉटरग्रेस कंपनीकडून वसुल करावा अशी मागणी या निवेदनामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महानगर (जिल्हा) तर्फे करण्यात येत आहे. निवेदनावर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, विशाल देशमुख, राजू मोरे, अमोल कोल्हे, सुशील शिंदे आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content