वाळू चोरीतील गुन्हेगार एक वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेकायदेशीर कृत्यात तसेच बेकायदेशीर वाळुच्या चोरीत गुन्हेगार असलेला पंकज दिपक मोरे (वय -२४) रा. यशवंत नगर, भडगाव ता. भडगाव यास पाचोरा भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या आदेशाने दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासुन एक वर्षांकरिता जळगांव, धुळे व नाशिक या जिल्ह्यातुन हद्दपार केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज मोरे हा सन २०२० पासून बेकायदेशीर कृत्यात, बेकायदेशीर वाळू चोरीच्या गुन्हेगारीत सामील आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मंडळ अधिकारी विजय भानुदास येवले व त्यांचे सहकारी हे भडगाव – पाचोरा रोडवर शासकीय आयटीआय जवळ अवैध गौणखनिज कारवाई कामी हजर असतांना त्यांना विना नंबरचे ट्रॉली व व ट्रॅक्टर वाळू चोरी करतांना आढळल्याने सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीवर कारवाई करीत होते. त्यावेळी पंकज दिपक मोरे याने मंडळ अधिकारी विजय येवले यांना धक्काबुक्की केली व सोबत असलेले तलाठी योगेश ब्राह्मणे, मंडळ अधिकारी एन. जी. बागड यांना दमदाटी करून ट्रॅक्टर मधील गौण खनिज (वाळू) खाली करून ट्रॉलीसह सदर ठिकाणाहून पळून जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात पंकज मोरे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज मोरे याच्या हद्दपारीच्या कारवाईद्वारे अवैध गौण खनिज चोरीविरूद्ध तसेच शासकीय कर्मचारी यांना दमदाटी, मारहाण करणे अशा गुन्ह्यांतील आरोपींविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे.

Protected Content