वारणा कामगार सोसायटी’च्या संचालकाची पत्नीकडून हत्या

कोल्हापूर वृत्तसंस्था । ‘वारणा कामगार सोसायटी’चे विद्यमान संचालक संजय घेवदे यांची त्यांच्या पत्नीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील राहत्या घरीच हत्येचा थरार घडला. पती देवाची पूजा करत असतानाच पत्नी संगीता घेवदे हिने त्यांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मुलगा रोहित घेवदे याने आई विरूद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

डोक्यात हातोड्याचे घाव घालत पत्नीने संजय घेवदे यांचा खून केला. घरगुती वादातून पतीची हत्या केल्याची कबुली आरोपी पत्नीने कोडोली पोलिसात दिली आहे. पन्हाळा तालुक्यातील जाखले गावात ही घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जाखले गावात सत्यवती कॉलनीमध्ये घेवदे दाम्पत्य दोन मुलांसह राहत होतं. 52 वर्षीय संजय घेवदे हे ‘वारणा कामगार सोसायटी’चे संचालक, तर ‘वारणा साखर कारखान्या’त कर्मचारी होते. संजय घेवदे सोमवारी सकाळी देवाची पूजा करत बसले असताना पत्नीसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. यामध्ये संजय हे खाली पडले. वादावादीनंतर पत्नीने संजय यांच्या डोक्यात घरातील लोखंडी हातोड्याचे घाव घातले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

या घटनेची फिर्याद नोंदवल्यावर घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेद्र पाटील यांनी भेट देऊन घेवदे यांना कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Protected Content