जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, खाशाबा संस्थेचे सचिव विनोद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. या सात दिवसीय विशेष शिबिरात ग्राम सर्वेक्षण, स्वच्छता अभियान, क्षेत्र भेट, जंगल निरीक्षण, योग प्राणायाम प्रशिक्षण, बाग सुशोभिकरण, पथनाट्य, सामाजिक जनजागृती, पक्षीनिरीक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. शिबिरात सामाजिक, आधुनिक आणि शैक्षणिक मुद्द्यांना अनुसरून व्याख्यानांचे आयोजन देखील करण्यात आले.
या शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी हेमंत पाटील, मानसी जोशी, पल्लवी अस्वार यांनी शिबिरात आलेले अनुभव उपस्थितांना समोर मांडले. या सत्रासाठी लाभलेले प्रमुख वक्ते आणि पाहुणे रत्नाकर पाटील यांनीं रासेयोच्या शिबिराचे महत्व सांगून हे शिबीर म्हणजे फक्त सात दिवसाचा उपक्रम नसून ‘रासेयो ही जीवन जगण्याची कला आहे’ असे प्रतिपादन केले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सत्राचे अध्यक्ष डॉ. किशोर पाठक यांनी या शिबिरात शिकविले जाणारे मूल्ये जर आत्मसात केली तर ही मूल्ये जीवन जगण्यासाठी अधिक उपयोगी पडतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रा. हितेश ब्रिजवासी यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष बडगुजर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुजाता रडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. हितेश ब्रिजवासी यांनी प्रयत्न केले. प्राचार्य.डॉ. किशोर पाठक आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन अधिकारी दिनेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या रासेयोचे हे पहिलेच शिबिर असून शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सचिव .विनोद पाटील, कोषाध्यक्ष हेमा अमळकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.