वाढीव पदांना मान्यता द्या : कृती समितीची आ. चौधरींकडे निवेदनाद्वारे मागणी

 

यावल, प्रतिनिधी । राज्यातील अनुदानीत उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यते संदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अनुदानीत उच्च माध्यमीक वाढीव, प्रस्तावित कृती समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांना शिक्षकांच्या महिला मंडळाने यावल येथे दिले.

 

महाराष्ट्र राज्यातील सुमारे १२०० पेक्षा अधिक अनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांचा घोळ २००३-०४ ते २०१८ , २०१९ पर्यंतच्या शिक्षकांचे वाढीव पदांचा प्रश्न शासन दरबारी मागील १० ते १२ वर्षापासून प्रलंबीत आहे. १२००पेक्षा अधिक शिक्षकांची पदे ही शासन मान्यता मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या वाढीव शिक्षक पदांवर महाराष्ट्रतील शेकडो शिक्षक विना वेतन अध्यापनाचे कार्य करीत आहे. सदरील वाढीव शिक्षकांची पदे ही दिनांक २६ मार्च २००२च्या शासन निर्णयानुसार त्या त्या शैक्षणिक वर्षात मंजुर व्हायला पाहीजेत. पण तसे न होता शासनाने हा प्रश्न अद्यापही प्रलंबीत ठेवल्यामुळे या पदावर काम करणाऱ्या शिक्षकांवर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कृती समितीद्वारे वेळोवेळी आंदोलन, निवेदन देऊन देखील राज्य शासन मागणीची दखल घेत नाही. या वाढीव शिक्षक पदांना वेतन अनुदानासह मान्यता देवुन त्यांची होणारी हेळसांड थांबवावी व ज्ञानदानासारखे पवीत्र काम मागील १० ते १२ वर्षापासुन विनावेतन इमान इतबाराने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळुन द्यावे अशी मागणी  कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सोनाली भाईदास पाटील, नम्रता रमेश महाजन , रूपाली अरूण कोळी यांच्या स्वाक्षरी असुन , या प्रसंगी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, युवक राष्ट्रवादीचे अॅड. देवकांत पाटील,  बोदडे नाना, धिरज कुरकुरे, अल्ताफ तडवी आदी उपस्थित होते.

 

Protected Content